Digital Library

November 10, 2026

उम्मुल मोमिनींन हजरत आएशा सिद्दिका (रजि.)

महाराष्ट्रात मराठी ही मुख्य भाषा आहे. महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे लोक राहतात. महाराष्ट्र हे पुरोगामी चळवळीचे केंद्र आहे. ह्या मराठी मुलुखात एक मोठी लोकसंख्या मुस्लीम समाजाची आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा समाज विखुरलेला आहे. ह्या समाजाचा कल मुख्यतः उर्दू शिकण्याकडे आहे. कारण ज्या धर्माशी म्हणजेच इस्लामशी हा समाज निगडीत आहे, त्या इस्लाम धर्माचे साहित्य उर्दूतच आहे. जेथे मुस्लिमेतर समाज ८० टक्केहून जास्त वसतो आणि ज्याची मायबोली मराठी आहे, त्या समाजाबरोबर मुस्लीम समाज राहत आहे. आज मुस्लीम समाज मराठी भाषेकडे वळला आहे. ह्या मराठी भाषिक मुस्लीम समाजासमोर सर्वात मोठी अडचण "इस्लाम धर्माचे ज्ञान" उर्दूत आहे. इस्लामविषयी, मुहम्मद (स्व.) पैगंबरांच्या जीवनाविषयी फारच कमी माहिती मराठी भाषेत उपलब्ध आहे. तसेच मुस्लिमेतर मराठी भाषिकसुद्धा ह्या उदात्त धर्माविषयी आणि मानवतेचे उपकार अखिल मानवजातीचे प्रेषित मुहम्मद (स्व.) विषयी फारच थोडी माहिती बाळगतात आणि त्याचे कारण सुद्धा इस्लामी साहित्य मराठीत नसणे, हेच होय. पण आम्हा सर्व मराठी भाषिकांचे सुदैव आहे की, अलीकडील काळात मुस्लीम समाजातून मराठी लेखक पुढे येत आहेत आणि इस्लाम धर्माची माहिती मराठी भाषिकांना करून देत आहेत. डॉ. इ. जा. तांबोळी सर जे सोलापूरमधील सोशल महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख आहेत, त्यांनी इस्लामचे मूळ ज्ञान किंवा माहिती मराठी भाषिकासाठी आणण्यासाठी पाऊल उचललेले आहे.त्यांची अनेक पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध आहेत. सदरहू “उम्मूल मोमीनीन हजरत आयेशा (रजि.)” हे पुस्तक सुद्धा त्याचाच एक भाग आहे. उम्मूल म्हणजेच माता आणि मोमीनीन म्हणजे समस्त मुस्लीम समाजाच्या माता. मुहम्मद पैगंबरांनी अनेक विवाह केलेले आहेत. (त्यास विविध कारणे आहेत.) इस्लाममध्ये मुहम्मद पैगंबरांच्या सर्व पत्नींचा दर्जा हा "समस्त मुस्लीम समाजाच्या माता" हा आहे. त्या सर्व अर्धांगिनींमधील 'हजरत आयेशा (रजि.) विषयी ह्या पुस्तकात माहिती देण्यात आलेली आहे, नव्हे हा “आयेशा" ह्या श्रेष्ठ पत्नीचा चरीत्रग्रंथ आहे. हजरत आयेशाचं सर्व पल्यामध्ये एकट्या कुमारीका होत्या, बाकी सर्वजणी एकतर विधवा होत्या किंवा तलाक पिडित. ह्या श्रेष्ठ ज्ञानी उच्च आचरणसंपन्न स्त्रीविषयी माहिती गोळा करून ती मुद्देसूदपणे ठेवणे, हे सोपे नव्हते. परंतु डॉ. इ.जा. तांबोळी यांनी हे महत्वपूर्ण तसेच अवघड काम फारच उत्कृष्टपणे केले आहे. त्यासाठी त्यांची कितीही प्रशंसा केली तरी कमीच आहे. ह्या छोट्याशा चरित्रग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची सोपी, साधी भाषा होय. अत्यंत सोप्या भाषेत मांडणी करण्यात आलेली आहे. ऐतिहासिक लिखाण करताना संदर्भ आवश्यक असतात, ते येथे आढळत नाहीत. पण त्यामुळे वाचकांना कोणतीही अडचण येणार नाही, असे मला व्यक्तिशः वाटते. डॉ. इ.जा. तांबोळी यांचे कार्य मराठी भाषिकासाठी मौल्यवान भेट आहे आणि त्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत होईल अशी आश आहे. त्यांच्या या कार्याबद्दल शुभेच्छा आणि हे पुस्तक सर्व पसंतीस उतरो, हीच सर्व शक्तिमान अल्लाहचरणी हीच प्रार्थना ! - मा.काझी शफिकुर रहमान सोलापूर.

View details →PDF available · Flipbook